आषाढ पौर्णिमेला गुरु पोर्णिमा असे म्हणतात. गुरू या शब्दाचा अर्थच महान, मोठा असा आहे. शिष्याने ते मान्य केल्यावरच तो कांही तरी शिकू शकतो. एका संस्कृत श्लोकात त्याचे "गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।" असे वर्णन करून त्याला नमन केले आहे. यात गुरूला देवतुल्य मानले आहे तर संत कबीर म्हणतात, "गुरु गोविंद दोऊ खडे काकै लागौ पाय। बलिहारी गुरु आपने गोविंद दीजो बताय।।" इथे त्यांनी देवाच्याही आधी गुरूच्या पायावर डोके ठेवणे पसंत केले आहे. "परीस हा लोखंडाला स्पर्श करून त्याचे फक्त सोने बनवतो पण गुरु तर शिष्याला थेट आपल्यासारखे बनवतो म्हणून तोच जास्त श्रेष्ठ." असे दुस-या एका ठिकाणी म्हंटले गेले आहे. "गुरूबिन कौन बताये बाट, बडा विकट यमघाट।", "बिन गुरु ग्यान कहाँसे पाऊँ" यासारखी कांही नकारात्मक अर्थाची पदेही आहेत. योग्य गुरु भेटल्याशिवाय आपण कांहीच करू शकत नाही असा नकारात्मक संदेश त्यातून दिला जातो आणि आपल्या प्रयत्नातली उणीव झाकायला एक निमित्य मिळते. महर्षी व्यासांनी सुद्धा एकलव्याच्या गोष्टीतून या मिथकातील फोलपणा दाखवून दिला आहे. गुरु द्रोणाचार्यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन तर त्याला मिळाले नव्हतेच, त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले सुद्धा नव्हते. तरीही द्रोणाचार्यांनी कौरव व पांडव या आपल्या शिष्यांना दिलेल्या शिकवणीचे ती अपरोक्षपणे ऐकून आणि तिचे नुसते अनुकरण करून एकलव्याने धनुर्विद्येमध्ये विलक्षण प्राविण्य प्राप्त केले होते.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घेतू' असे म्हणून सुरुवात केली.
व्यासपौर्णिमेच्या दिवशी 'ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे' अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. 'गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?' हेच खरे आहे.
गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो -
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll
संदर्भ : सनातन संस्थानिर्मित 'ग्रंथ सण,धार्मिक उत्सव व व्रते'
अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात.
संपूर्ण भारतभर आज गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. फार पूर्वी अगदी पुरातन काळात आपल इथे आश्रम गुरुकुल पद्धत होती. गुरूंकडून विद्या घेण्यासाठी विद्यार्थी स्वत: गुरुकुलातच राहात असत. गुरूला पिता तर गुरुपत्नीला माता समजत. म्हणजे त्या शिष्यांच्या जीवनात गुरूंना एक अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान होते. अशी अनेक गुरुकुल त्या काळात होती आणि अनेक हुशार-पंडित-तत्त्वज्ञानी विद्यार्थी त्यातून घडले अन् जगाला आदर्श ठरले. युगानुयुगे ही गुरु-शिष्याची परंपरा सुरूच आहे. अगदी ज्ञानेश्वरांच्या काळातदेखील एवढा मोठा योगी चांगदेव पण त्यने लहानग्या मुक्ताईला गुरू मानले. इथे वयाचा संदर्भ जोडताच येत नाही. येतो प्रश्न तो ज्ञानाचा. व लहान असूनही जर जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं पांडित्य जर एखाद्यात असेल तर मग त्याला गुरूच म्हणावं लागेल. म्हणजेच जीवनाचं तत्त्वज्ञान ज्याच्याकडून शिकायला मिळतं तो म्हणजे गुरू.
आता पुढे पुढे शाळा पद्धती सुरू झाली. ठराविक वेळ, अभसक्रम. त्यातून साधला जाणारा विविधांगी विकास. यात आता गुरूचा गुरुजी म्हणून प्रवास झालेला, गुरुजींना कधी कधी मास्तरही म्हटलं जायचं. तर असे हे गुरुजी.
"छडी लागे छम छम विद्या येई घम घम!"
असं म्हणत कधी छडी देऊन तर कधी प्रेमाने गोड बोलून विद्यार्थ्यांना विद्या देतच आलेत. पूर्वी हे गुरुजी केवळ शाळेचेच गुरुजी नसत तर गावाचे गुरुजी असत. संपूर्ण गाव अगदी गुरुजींना आदराने नमस्कार कयराचा. प्रसंगी कुठल्याही गोष्टीसाठी, सल्ला मागण्यासाठीसुद्धा गुरुजींकडे यायचा. यावेळी कधी गुरुजींची आर्थिक परिस्थिती किंवा इतर याचा मापदंड नसायचा, तर आदर केला जात होता तो ज्ञानाचा, त्या पेशाचा. साने गुरुजींसारख्या गुरुजींचा आपण आजही आदर्श घेतो. विद्यार्थ्यांसाठी ध्येयवेडे असलेलेसुद्धा अनेक गुरुजी आपल्या इथे होते अन् आहेत. आता या गुरुजींचं रूपांतर किंवा बदल ‘सर’ मध्ये झाला. काळ बदलला, थोडं वातावरण बदललं पण समाजात शिक्षकाचं स्थान आदराचंच आहे. पारंपरिक वेशातले गुरुजी बदलत वेशभूषेतील ‘सर’ झाले असले तरी या पेशातील तत्त्वं बदलली नाहीत. बे एके बे एवढंच बोलून, शिकवून आता चालत नाही तर बदलत्या पर्यावरणाचं भान ठेवावं लागतं. ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं लागतं. काळाच्या या ओघात विद्यार्थी टिकावेत, वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावेत यासाठी आता हे शिक्षक प्रयत्न करीत आहेत. आज आपल्या विद्यार्थ्याला केवळ स्वत:पुरता घडवून चालणार नाही म्हणून त्याचा सामाजिक जाणिवा, राष्ट्राप्रतिच जाणिवा, बदलत्या सर्व परिस्थितीचा जाणिवा जागृत करण्याचं कामही शिक्षकच करीत आहेत. समाजाचं ऋण, राष्ट्राचं ऋण ह्या सर्व कल्पना विद्यार्थ्यात रुजविण्याचं कामही शिक्षकच करीत आहेत. आजही विद्यार्थ्यांबद्दलच्या शिक्षकांच्या स्वप्नातील कल्पना फार वेगळ्या आहेत. विद्यार्थी जेव्हा शिक्षकांपेक्षाही ज्ञानाने मोठा होईल तोच शिक्षकाचा खरा आनंद आहे.
जेव्हा कर्तृत्वाने मोठा होऊन शिक्षकांच्या समोर तो विद्यार्थी येईल तेव्हा खर्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केल्याचे समाधान शिक्षकांना मिळेल. आजही अनेक ध्येयवेडे शिक्षक आहेत. आदर्श कल्पना डोक्यात घेऊन झपाटलेले कृतिशील, उपक्रमाशील शिक्षक समाजात आहेत. शिक्षक हा खर्या अर्थाने समाजाचा शिल्पकार असतो.
+91 942 121 9480 (WhatsApp)
+91 787 533 0269
Tanvi Apartment, Vidyanagar, Behind Kranti Clinic, Civil Hospital Road, Gaonbhag, Sangli, Maharashtra.(416416)